[The Story of Mangalagaur (in simple language)
[ चातुर्मास कहाणीच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला लक्षात येत नाहीत. ही मंगळागौर कहाणी अगदी साध्या भाषेत सांगत आहे.]

आटपाट नगर होतं. तिथे एक सुमुख नावाचा वाणी राहत होता.त्याला काही मुलगा नव्हता. मुलबाळ नाही म्हणून दोघे नवरा बायको फार दुःखी असत. मुलबाळ व्हावं, देवाची कृपा व्हावी म्हणून जमेल तेवढा दानधर्म करत. देवदेव करत असत.
त्याच्या घरी नेहमी एक अगदी वयस्कर गोसावी भिक्षा मागायला येई. घरात जे कुणी समोर असेल ते भिक्षा घालत जाई. पण जेव्हा कधी सुमुख वाण्याची बायको सुमुखी भिक्षा घालायला यायची तेव्हा मात्र गोसावी बुवा भिक्षा घ्यायचे नाहीत. बाळा.. आम्ही निपुत्रिकाच्या हातून भिक्षा घेऊ नाही शकणार.. असं म्हणून नमस्कार करून ते निघून जात. वाण्याची बायको फार अस्वस्थ व्हायची. प्रत्येक वेळी नवऱ्याला हे सांगून ती दुःखी व्हायची.
असं खूपच वेळा झाल्यावर नवरा म्हणाला मी युक्ती सांगतो ते कर. नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे पुढच्या वेळी गोसावी आल्यावर ती दाराच्या मागे लपून बसली. आणि त्याने अल्लक म्हणून भिक्षेसाठी पुकारल्यावर तिने पटकन गोसाव्याच्या झोळीमध्ये सोन्याची भिक्षा घातली. तिला वाटलं अशी भिक्षा बघून फार प्रसन्न होतील गोसावी बुवा.. पण गोसावी मात्र फार रागावले!
“मूर्ख मुली!!! माझा नेम मोडलास? बाई घाबरली.. बुवा रागावू नका हो.. मुलबाळ व्हावं म्हणून आम्ही नवरा बायको जमेल तो सगळं दान धर्म, देव देव करतो. तुम्ही बऱ्याच वेळा विन्मुख होऊन निघून गेलात.. म्हणून मी अशी चोरून भिक्षा घातली.
” मूल व्हावं म्हणून हे केलं आहेस तू! आता तर तुला मुळीच मूल होणार नाही.. तुझ्या नशीबातच नाही ते!! बुवांचं हे बोलणं ऐकून सुमुखी बाईला चक्करच यायची बाकी राहिली.. तिने पटकन पुढे होऊन गोसाव्याच्या पायावर डोकं ठेवून माफी मागितली. तिच्या अश्रुनी गोसावी बुवांचे पाय अक्षरशः धुवून निघाले होते. तिच्या मनापासून माफी मागण्याने बुवांना वाईट वाटलं.
रडू नकोस! तुझ्या नशिबात मूल नाही हे खरच आहे. आता मी सांगतो तो उपाय करा. तुझ्या नवऱ्याला सांग. निळ्या घोड्यावर बस. निळी वस्त्र परिधान कर. रानात जा, जिथे घोडा असेल तिथे खण. देवीचे देऊळ लागेल. तिची प्रार्थना करा. तीच तुला संतती सुख देईल. उपाय सांगून बुवा आपल्या वाटेने निघून गेले.
बुवाने सांगितलं तसंच वाणी रानात गेला. जिथे घोडा थांबला तिथे त्याने खणायला सुरुवात केली. हळूहळू त्या उत्खननात एक सुंदर देवीचे देऊळ सापडले. देऊळ तर फारच छान होतं. अगदी श्रीमंत.. सोन्याचे सुंदर मंदिर.. हिरे जडवलेले खांब.. माणिक लावलेला मंदिराचा कळस.. आणि आत देवीची प्रसन्न मायाळू अशी मूर्ती! त्या मूर्तीकडे बघून त्याला प्रसन्न वाटू लागलं. फार मनापासून त्याने देवीची पूजा केली. त्याच्या भक्तीने देवी सुद्धा प्रसन्न झाली.
बघता बघता तिथे देवी स्वतः प्रकट झाली. सुमुख ला म्हणाली.. “बाळा, तुझ्या भक्तीमुळे मी प्रसन्न झाले आहे. माग तुला काय हवे.” सुमुखने अर्थातच संतती बद्दलच मागणी केली. ” आई, घरदार, पैसा अडका, गुरं ढोरं सगळं आहे. मुलबाळ हवे.” देवी आई म्हणाली, ” बाळा, तुझ्या आयुष्यात संतती सुख तर नाही. पण तरीही मी तुझी इच्छा पूर्ण करेन. अल्पायुषी मुलगा घेतलास तर गुणी मिळेल, दीर्घायुष्यी पुत्र घेतलास तर जन्मापासून आंधळा असेल, कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल ते मागून घे.”
त्याने अल्पायुषी पुत्र मागितला. देवीने त्याला सांगितलं. ठीक आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला जा. तिथं एक गणपती आहे. त्याच्यामागे एक आंब्याचे झाड आहे. गणपतीच्या दोंदावर [ तोंद/ किंवा पुढे आलेल्या पोटावर] पाय देऊन झाडाचा एक आंबा काढून घे. घरी जाऊन बायकोला खाऊ घाल. ” एवढं सांगून देवी अदृश्य झाली..
[ क्रमशः]

