मंगळागौरीची पूजा कशी करतात?

महाराष्ट्रातल्या बऱ्याच घरात मंगळागौरीची पूजा करतात. मुलींचे लग्न झाल्यापासून 5 वर्षे दर वर्षी हे व्रत केलं जातं. या पूजेत शिव आणि गणपतीसह गौरीची पूजा केली जाते. त्यानंतर एखाद्या नवीन लग्न झालेल्या मुलीची मंगळागौर करून त्यात स्वतःच्या व्रताचे उद्यापन करतात. पहिल्या वर्षी हे व्रत माहेरी केलं जातं. कुठलेही व्रत केल्यावर त्याचे उद्यापन अर्थातच सांगता ही करायचीच असते. बऱ्याच जणी मंगळागौर हौसेने करतात पण व्रत उद्यापन करत नाहीत.

यात पुजेसाठी सुपारीचा गणपती बनवून त्याची पूजा केली जाते. शिवाय काही घरात खास मंगळागौरी बनवलेल्या असतात. बाजूने ४ खांब असलेल्या आणि मध्ये देवी असलेल्या अश्या मूर्ती रेडिमेड सुद्धा मिळतात. पण बहुतेक घरात लग्नात मिळालेल्या अन्नपूर्णा पूजेत ठेवल्या जातात. जर आपण पूजेसाठी दुसऱ्यांच्या घरी जाणार असू तर आपली आपली अन्नपूर्णा सोबत नेऊन तिथे पूजेत मांडायची असते. नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी विसर्जन झाल्यावर ती परत घरी नेऊन आपल्या पुजेत मांडू शकता. कोकणस्थ लोकांकडे कणीक हळद वगैरे भिजवून गौरीला सगळे दागिने करून घालतात. देशस्थांकडे पुरणाचा पाट करून करून त्यावर गौर बसवतात. पाटाच्या बाजुला 4 पुरणाचे उभे मुटके करून आमले खामले [ खांब] बसवतात.

हळद, कुंकू, गंधामृत, अक्षता, धोत्रा, मोगरा, माका,बेल,तुळस,शमी,आघाडा,डोरली, शमी,कान्हेरी,रुई,अर्जुन,विष्णुकांत,दुर्वा अश्या 16 प्रकारच्या पत्री आणि फुलं , काड वाती,बोट वाती ने ओवाळून वाहून पूजा केली जाते. 16 मुगाची डाळ आणि 16 अखंड तांदूळ [ 16 no. मोजून वाहतात.] याशिवाय 16 सुपारी, 16 विड्याची पाने, खण नारळाने देवीची ओटी भरतात. [ दर मंगळवारी हीच वापरली तरी चालते.] पूजा करताना खडीसाखर खाऊन तोंड गोड करून पूजा करतात. पूजा झाल्यावर 16 वाती असलेल्या दिव्याने देवीची आरती केली जाते.

हातात तांदूळ घेऊन मनोभावे मंगळागौरीची कहाणी ऐकतात. केलेल्या पूजेवर डेकोरेशन म्हणून पिंडीचा आकार देतात. [ एखादा मोठा कुंडा किंवा उभ्या आकाराचं पातेलं घेऊन ते निरांजनावर धरून त्यावर काजळी धरली जाते. शिव पिंडीचा काळा रंग तात्पुरता यावा म्हणून. त्याच्या मागे माका वगैरे कणसाच्या पानांचे नाग बनवून लावतात. बाजूने फुलं वगैरे पसरून शिवपिंडीचा आकार देतात. शंकराला केवडा,चाफा, लाल फुलं, तुळस वगैरे वाहत नसतात. सकाळी पुरणाचा नैवेद्य दाखवायचा असतो. मुगाच्या डाळीची अळणी खिचडी[ मीठ न घातलेली] असतात.

यानंतर दुपारी सगळ्यांनी एकत्र बसून जेवणं होतात. जेवताना वसा असलेल्या मुलीनी न बोलता जेवावं अशी पद्धत आहे. आता तुम्ही विचाराल असं का बरं.. तर याचं काही कारण नाही. देवीला नैवेद्य वाढलेला मुलीनीच खाऊन घ्यावा.

संध्याकाळी अश्याच सगळ्या मुली एकत्र जमून मंगळागौर जागवतात.रात्रभर मंगळागौरीचे खेळ खेळतात. आजकाल तर असे मंगळागौरी खेळणारे ग्रुप सुद्धा असतात. रात्री पुन्हा आरती करतात [ ही आरती अर्धीच करतात.] रात्री देवी समोर दुधात जाईचे सुगंधी फुल घालून त्याचा नैवेद्य दाखवतात. दुसऱ्या दिवशी हेच फुलाने लागलेले दही भातावर घालून त्याचा नैवेद्य दाखवतात. किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवतात.[ ही पद्धत प्रत्येक घरात वेगवेगळी असते.] या पूजेत काहीही विसरलं असेल तर त्या ऐवजी अक्षता टाकाव्यात.

सकाळी आरती करून नैवेद्य दाखवून व्रताचे विसर्जन केले जाते. पहिल्या वर्षी मोठ्या थाटामाटात पूजा केल्या तरी पाच वर्षे हे जमेल असं नसतं. त्यामुळे जमले त्या पद्धतीने ही पूजा करून घेतात.

तुमच्याकडे पूजेची अजून काही पद्धत असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा!

Leave a Reply

Discover more from ब्लॉगवती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading