
कहाणी गोपद्माची??!!..
परीक्षेच्या वेळी काही प्रश्न फक्त फॉरमॅलिटी म्हणून पहायचे असतात. ते कधीही परीक्षेला येणार नसतात आणि त्यामुळे त्यांच्या असण्या नसण्याचा फारसा फरक पडणार नसतो. तरीही ते दर वर्षी syllabusमध्ये असतातच!! ही कहाणी सुद्धा अगदी तशीच.. कहाणी पुस्तकाचे पान उलटताना नक्की पाहिलेली.. पण कधीही न वाचलेली! तरीही गणपतीच्या खालोखाल हीच कहाणी पुस्तकात असते.या एकमेव कहाणीमध्ये आपल्या माहितीची काही पात्रं दिसतात. कृष्ण, सुभद्रा, कौरवसभा, पांडवसभा वगैरे.. देवादिकांच्या सभेत कौरव पांडवांनी स्थान मिळवलं आहे, हे खरं म्हणजे अजिबात पटत नाही. पण कहाणी पुढे सरकते तसे बरेच संदर्भ लक्षात येऊ लागतात.
कहाणीचे कथानक अगदी सोपे. स्वर्गलोकात इंद्रसभा, चंद्रसभा, कौरवसभा, पांडवसभा आणि अजून एखादी निनावी सभा.. अश्या पाच सभा बसलेल्या आहेत अशी एक कल्पना. इतक्या सगळ्यांनी एकत्र येऊन celebration करायला हवं असा तो एखादा खास दिवस असणार.. सगळीकडे अगदी उत्साहाचे वातावरण आहे. ताशे,मर्फे वाजत आहेत,रंभा,अप्सरा नाचत आहेत. आनंदी आनंद आहे.. आणि अशातच रंगमें भंग होतो..
कुठल्याश्या एका तंबोर्याच्या तारा तुटतात आणि मृदुंगाच्या भेर्याही फुटतात. एखाद्या वेबसीरिजच्या रंजक वळणावर वायफाय कनेक्शन गेलं.. किंवा अचानक विडियो बफरिंग झालं की जो त्रास होतो तो आपण मर्त्य मानव सहन करू शकत नाही.. ते तर देवांचे देव राजे हो!! तिथे काय गडबड उडाली असेल याची कल्पना आपण करूच शकतो! आपल्या समाजाचे प्रतिबिंब वाटाव्या अश्या चांगल्या वाईट, शांत रागीट,अनेक प्रवृत्तीच्या अनेक लोकांनी आणि सभांनी मिळून बनलेल्या त्या मोठ्या सभेचा हुकूम येतो. “करा रे हांकारा..पिटा रे दांडोरा!! गावात कोणी वाणवश्यावाचून असेल तर त्याच्या पाठीचा तीन बोटं कंकर काढा, तंबोर्याला तार लावा,कीर्तन चालू करा,रंभा नाचत्या करा!”
{ आता खरी कहाणी समजून घेण्याची कसरत सुरू होते. कंकर हा शब्द साधारणपणे दगड किंवा तुकडा या अर्थाने आपण वापरतो. पाठीचा कंकर काढून तंबोर्याच्या तारा करण्यासाठी वापरायचा म्हणजे तो मेरूदंड किंवा पाठीचा कणाच असू शकतो.}
सभेचा असा हुकूम आला आणि दूत गडबडीने वाणवसा न घेतलेले कोण आहे याचा शोध घेऊ लागले. आता तुम्ही विचार कराल, काय संबंध वाण घेण्याचा आणि पाठीच्या कण्याचा?? तर राजे हो..एखाद्या गोष्टीचा वसा घेणं म्हणजे झोकून देऊन एखादं ध्येय चिकाटीने पूर्ण करणे आहे.त्यात passion आहे, कष्ट आहेत.१०० वेळा पडल्यावर सुद्धा परत प्रयत्न करायची ताकद आहे. आणि ज्याच्या अंगी हा गुण नाही त्याच्या पाठीचा कणा मोडणे फार अवघड असेल का?? ते- ‘मै झुकेगा नही’..सारखं प्रकरण असायची अजिबात शक्यता नाही!!}
तेव्हा असा हुकूम आल्यावर कृष्णदेव भ्यायले.आणि त्यांच्या मनात सगळ्यात आधी कुणाचं नाव आलं असेल तर ते आपल्या बहिणीचं.. सुभद्रेचं! आपल्या माणसाच्या चांगल्या वाईट खोडी आपल्याला माहीतच असतात. त्यामुळे माहेर,नवरा,सासर, मुलं या गोतावळ्यात सतत रमलेली,सगळ्यांचं सगळं प्रेमाने करण्यात गुंतलेली माझी बहीण सुभद्रा हिने काही वाणवसा केला नसेल.. हे guess करायला कृष्णाला अजिबात वेळ लागला नाही. मग कृष्ण कसाबसा सभेतून बाहेर पडून तिच्याकडे जाऊन चौकशी करतो.. आणि अर्थातच तिनं काही वाण वसा केला नाही हे कृष्णाच्या लक्षात येतं.
आता सुभद्रेचा विचार केला तर आपल्याला ती कृष्ण बलरामाची बहीण, अर्जुनाची पत्नी आणि अभिमन्युची आई म्हणून परिचित आहे. पण अनेक वेळा अनेक ठिकाणी उल्लेख येऊन सुद्धा सुभद्रेचा विशेष गुण दिसतच नाही. जगन्नाथपुरीच्या मंदिरात आपल्या दोन्ही लाडक्या भावांसोबत ती उभी राहिलेली दिसते. मात्र तरीही तिचं पूजनीय असणं या भावांसोबतच आहे असं सतत जाणवतं. अर्थात प्रत्येक यशस्वी पुरूषमागे त्याच्या आयुष्यातल्या आई, बहीण, पत्नी या सगळ्याच स्त्रियांनी दिलेला भक्कम पाठिंबा आणि आधार नाकारता येत नाहीच. यात प्रत्येक स्त्रीचं थोरपण आहेच! पण कृष्ण इतका वरवर विचार करणारा मुळीच नसणार!
तो कृष्ण होता! एक तत्त्वज्ञ होता. कुठली लढाई स्वत: लढायची असते, कुठली वेळीच सोडून द्यायची असते, कुठे शस्त्र हाती घ्यायचं, कुठे नुसतं सारथ्यच करायचं, आपल्या प्रियजनांना आयुष्यभर सोबत घेऊनच चालायचं असतं मात्र गरज पडलीच तर त्यांना एकटंही सोडायचं असतं..तसं आपणही एकटं चालायचं असतं! हा व्यवहाराचा धडा शिकवणारा तो एकच देव!! १६ सहस्र स्त्रियांना जो आपला पालक किंवा जोडीदार व्हायला हवा असा वाटला,त्या कृष्णाला स्त्रियांचं मन कळलं असेलच तसं त्यांच्यासाठी चांगले वाईट काय ते ही कळतच असणार! आपल्या सख्यावर निरतिशय प्रेम करणारी राधा कायम तळमळत राहिली.. सतत आपल्या मुलाबाळांचा आणि आप्तजनांच्या इच्छेचा विचार करणारी कुंती आयुष्यभर झगडत राहिली.. जन्मापासून अनेक संकटं झेलणार्या द्रौपदीला सुद्धा कौरव विरुद्ध पांडव राजकारण असह्य झाले तिथे या निरागस सुभद्रेची काय कथा! स्वतःची passion ओळखून ती जपल्याशिवाय आणि कणखर बनल्याशिवायही सुभद्रेसमोर पर्याय नाही.
पुढे कृष्णांनी तिला छानसा वसा सांगितला. गोकुळात रमलेल्या त्या कृष्णाला कामधेनु आणि गोपद्मच आवडणार! त्यामुळे श्रीकृष्णाने तिला तिच्या अंगच्या गुणांची जाणीव करून देणारा गोपद्माचा वसा सांगितला.. आणि सुभद्रेने त्याप्रमाणे व्रत केले सुद्धा!. अर्थातच सुभद्रेवर आलेले संकट टळते. बाकी हा वसा काय असतो आणि संकट कसे टळते हे पहाण्यासाठी कहाणीच वाचायला हवी.
एक छोटासा प्रश्न – आता ही कहाणी इंद्राच्या सभेची.. गोपद्माची.. की सुभद्रेने ‘त’ वरून ताकभात ओळखून स्वतःमध्ये घडवलेल्या बदलाची?.. अर्थात, सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे काही प्रश्न डायरेक्ट परीक्षेत येत नसतात. पण तरीही syllabus मध्ये असतात.. का? हे आपणच ठरवायचं.
[
